भारताने १९५६ रोजी आजच माणसाला माणूसपण शिकवणारे आपले 'महान वैभव' हरवले होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर कायदेपंडित तथा शोषित व वंचितांसाठी खऱ्या मानवी स्वातंत्र्याची कवाडे खुली करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. या घटनेला आज बरोबर 68 वर्षे झाली. बाबासाहेब भारतातील दिनदुबळ्यांचा आवाज होते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. आजही वयोवृद्ध लोक या घटनेची आठवण सांगताना म्हणतात की, बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी समजली आणि आम्ही वाट मिळेल तिकडे धावत सुटलो. अनेकजण धुळीने माखलेल्या रस्त्यावर लोळून ओक्साबोक्सी रडताना आम्ही पाहिले.
चला तर मग आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अखेरचे 24 तास कसे गेले? 5 डिसेंबर रोजी त्यांची दिनचर्या कशी होती? याचा हा आढावा.
पहिल्यांदा पाहू बाबासाहेबांची कौटुंबिक पार्श्वभूमी
![]() |
बाबासाहेबांचे पालक. |
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. ते त्यांच्या पालकांचे 14 वे व शेवटचे अपत्य होते. रामजी मालोजी सकपाळ असे त्यांच्या वडिलांचे नाव होते. रामजी ब्रिटीश सैन्यात सुभेदार होते. ते संत कबीर यांचे अनुयायी व सुशिक्षित होते. भीमराव जेमतेम 6 वर्षांचे असताना त्यांच्या आई भीमाबाई यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आत्याने त्यांचे संगोपन केले. भीमरावांना आपल्या शालेय जीवनातच अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला.

एक नजर पाहू बाबासाहेबांच्या शिक्षणावर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम. ए. पदवीसाठी 25 जुलै 1913 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जून 1915 मध्ये एम. ए. ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 1916 मध्ये इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. प्रो. कॅनन व सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1920 साली ही पदवी संपादन केली. पुढे 1922-23 मध्ये बाबासाहेबांनी युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास पूर्ण केला व पदवी संपादन केली. म्हणजे बाबासाहेब एम. ए. , पीएच.डी., एलएल.डी., डॉ. डिलिट, बार ॲट लॉ आदी विविध पदव्यांनी उच्चविद्या विभूषित झाले.
बाबासाहेबांनी जगातील सर्वच सामाजिक शास्त्रांचा म्हणजे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहासशास्त्र आणि कायदा शास्त्राचा सखोल अभ्यास केला. एवढेच नाही तर जगभरातील साम्राज्यशाही व भांडवलशाहीसह वंशवाद व जागतिक स्तरावर असलेल्या गुलामगिरीचाही सखोल अभ्यास केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनात, चिंतनात व लेखनात प्रचंड ताकद होती. ज्ञानसंपन्नतेच्या या शक्तीमुळेच व्यक्ती, समाज, राज्य व अखेर राष्ट्र महान बनते असा त्यांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी दिवसाचे 18-18 तास अभ्यास करून शेकडो वर्षांचा ज्ञानाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी त्यांनी भरपूर संघर्ष केला. यामुळेच बाबासाहेब भारताच्या नव्या उभारणीचे एक महान वैभव बनले होते.
शेवटचे सार्वजनिक दर्शन कुठे झाले?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 च्या नोव्हेंबर महिन्यातील शेवटचे 3 आठवडे दिल्लीबाहेर होते. 12 नोव्हेंबर रोजी ते पाटणामार्गे काठमांडूला गेले. तिथे 14 नोव्हेंबर रोजी जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती. या परिषदेचे उद्घाटनक नेपाळचे तत्कालीन नरेश राजे महेंद्र यांनी केले होते. या कार्यक्रमात नेपाळच्या राजांनी बाबासाहेबांना आपल्या शेजारी बसण्याचा मान दिला होता. त्यांचा हा दौरा भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला होता. नेपाळमध्ये त्यांनी गौतम बुद्धांचे जन्मस्थान असणाऱ्या लुंबिनीला भेट दिली. येताना ते बुद्धगयेलाही गेले. 4 डिसेंबर रोजी बाबासाहेब दिल्लीत परतले. तेव्हा ते पुरते थकले होते.
याच कालावधीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले होते. बाबासाहेब राज्यसभेचे सदस्य होते. पण प्रकृती अस्वास्थ्याअभावी त्यांना संसदेत जाता येत नव्हते. त्यानंतरही ते 4 डिसेंबर रोजी अधिवेशनाला गेले. पण ते दुपारीच परतले. त्यानंतर दुपारी ते जेवण करून झोपले. हे त्यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन होते.
बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे 24 तास
![]() |
| माईसाहेब व बाबासाहेब. |
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम डॉ. सविता भीमराव आंबेडकर अर्थात माईसाहेबांनी (बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी) आपल्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या पुस्तकात नमूद केला आहे. त्यानुसार, बाबासाहेब 5 डिसेंबर रोजी म्हणजे आपल्या निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी 8.30 च्या सुमारास उठले.
माईसाहेबांनी त्यांना चहासाठी उठवले. तिथेच दोघांनी चहा घेतला. तेवढ्यात नानकचंद रट्टू (स्वीय सहाय्यक) तिथे धडकले. त्यांनीही चहा घेतला. त्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब व डॉक्टर मालवणकर या तिघांनी एकत्र न्याहारी केली. त्यानंतर बाबासाहेबांनी वर्तमानपत्रांवर नजर टाकली. त्यानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांना औषधी दिली. त्यानंतर त्या स्वयंपाकघराच्या दिशेने गेल्या. तिकडे बाबासाहेब व मालवणकर बराचवेळ गप्पा मारत बसले होते.
5 डिसेंबर दुपारी 12.30 वा.
दुपारी 12.30 च्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावण्यास गेल्या. तेव्हा बाबा लायब्ररीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावणा लेखण करत होते. माईसाहेब त्यांना जेवण्यासाठी घेऊन आल्या. जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी आराम केला. त्यानंतर माईसाहेब खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबर रोजी रात्री विमानाने मुंबईला जाणार होते. त्यांच्यासोबत मालवणकर होते. दुपारी 2.30 च्या सुमारास माईसाहेब घरी परतल्या. त्यानंतर 5.30 च्या सुमारास मालवणकर आले. त्यावेळी बाबासाहेब रागात होते.
5 डिसेंबर रोजी रात्री 8 वा.
5 डिसेंबर रोजी रात्री 8 वा. बाबासाहेबांची जैन धर्मगुरू व त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांशी पूर्वनियोजित भेट होती. बाबासाहेब या शिष्टमंडळासोबत चर्चा करत होते. 6 डिसेंबर रोजी जैनांचे संमेलन भरणार होते. त्यात जैन मुनींशी चर्चा करन जैन व बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घ्यावा असा आग्रह जैन शिष्टमंडळाने धरला होता. ही चर्चा सुरू असताना मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. नंतर जैन धर्मिय शिष्टमंडळही निघून गेले. तत्पूर्वी त्यांनी त्या शिष्टमंडळाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चर्चेस येण्याचे निमंत्रण दिले. नंतर त्यांनी शांतपणे बुद्धवंदना म्हटली.
बाबासाहेबांनी रात्री थोडेसेच जेवण केले. ते माईसाहेबांचे जेवण होईपर्यंत तिथेच बसले. त्यावेळी ते चलो कबीर तेरा भवसगर डेरा, हा दोहा गुणगणत होते. त्यानंतर काठीच्या मदतीने ते आपल्या बेडरुमकडे गेले. त्यावेळी त्यांच्या हातात काही ग्रंथ होते. जाताना त्यांनी नानकचंद रट्टू यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेची प्रत व एस एम जोशी, आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. हे काम करून रट्टू आपल्या घरी गेले.
रात्री 11.30 च्या सुमारास झोपी गेले
माईसाहेब आपल्या पुस्तकात लिहितात, बाबासाहेब 5 डिसेंबर रोजी रात्री बराचवेळ लिहित व वाचत बसले होते. त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अखेरची सुधारणाही केली. त्यानंतर 11.30 च्या सुमारास ते झोपी गेले. ही रात्र त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली.
मी हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण...
6 डिसेंबर 1956 रोजी रोजी माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून बाबासाहेबांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेल्या. तेव्हा घड्याळात 7 - साडेसात वाजले असतील. माईसाहेब लिहितात, खोलीत गेल्यानंतर पाहिले की, साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी त्यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. पण त्यांची काहीच हालचाल दिसली नाही. मला वाटले, त्यांना गाढ झोप लागली असेल. नंतर मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलेच नाही...
बाबासाहेबांचे झोपेतच महापरिनिर्वाण झाले होते. माईसाहेबांना प्रचंड धक्का बसला. त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यावेळी बंगल्यात माईसाहेब व मदतनीस सुदामा हे दोघेच होते. माईसाहेबांनी हंबरडा फोडला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी सुदामाला हाक मारली. तसेच डॉक्टर मालवणकर यांना फोन लावला. मालवणकरांनी त्यांना कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. पण बाबासाहेबांचे निधन होऊन अनेक तोस उलटून गेले होते. त्यामुळे इंजेक्शन देता आले नाही. मग माईसाहेबांनी नानकचंद रट्टू यांना बोलावण्यास सांगितले.
नानकचंद रट्टू धावतच पोहोचले. त्यानंतर कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले, तर कुणी कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीही उपयोग झाला नाही. बाबासाहेब सर्वांना सोडून निघून गेले होते. माईसाहेब पुढे सांगतात, आम्ही तिघांनीही विचार करून बाबासाहेबांच्या निधनाची बातमी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नानकचंद रट्टू यांनी ओळखीच्या प्रमुक व्यक्ती, सरकारी विभाग, पीटीआय, यूएनआय व आकाशवाणीला फोन करून बाबासाहेब गेल्याची वार्ता दिली.
बाबासाहेब गेल्याची वार्ता काहीवेळातच वाऱ्यासारखी देशात पसरली. त्यांतर दिल्लीतील 26, अलिपूर रोडच्या दिशेने त्यांच्या अनुयायांचे हजारोंचे जत्थे लोटले. त्यांच्या पार्थीवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जगजीवनराम यांनी बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली. त्यानुसार पार्थिव नागपूरमार्गे मुंबईला नेण्यात आले.
अवघा दलित समाज शोकसागरात बुडाला
बाबासाहेबांच्या निधनामुळे अवघा दलित समाज शोकसागरात बुडाला होता. आपल्याच कुटुंबातील कुणाचा तरी मृत्यू झाल्याच्या भावनेतून लाखो लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सुप्रसिद्ध लेखक दया पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात, त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे कामावर निघालो होतो. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बाबासाहेब गेल्याची बातमी होती. मला धरणीकंप झाल्याचा भास झाला. मी एवढा शोकाकुल झालो की, जसे काही माझ्या घरातीलच एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. घराची चौकट धरून मी रडू लागलो. मी पेपर वाचून का रडत आहे हे माझी आई व पत्नीला समजत नव्हते. त्यानंतर मी त्यांना बाबासाहेब गेल्याची बातमी सांगताच त्या दोघींनीही हंबरडा फोडला.
दया पवार पुढे लिहितात, बाहेर निघाल्यानंतर मी पाहिले लोक घोळक्याने उभे होते. बाबासाहेबांचे निधन दिल्लीत झाले होते. त्यांचे पार्थिव सायंकाळपर्यंत विमानाने येणार होते. मला नोकरी लागून 2-3 महिनेच झाले होते. त्यामुळे मी सुट्टी टाकण्यासाठी वेटनरी कॉलेजात गेलो. माझ्या सुट्टीचे कारण पाहून साहेब संतापले. ते म्हणाले, अरे सुट्टीचे कारण हे का लिहिले? आंबेडकर एक नेते होते व तू सरकारी नोकर. काहीतरी खासगी कारण लिही.
मी तसा अत्यंत शांत स्वभावाचा होतो. पण त्या दिवशी मी अर्जातील कारण बदलले नाही. उलट साहेबांना म्हणालो, साहेब, ते आमच्या कुटुंबातील सदस्यच होते. त्यांनी आम्हाला किती दाट काळोखातून बाहेर काढले हे तुम्हाला नाही समजणार. माझ्या नोकरीचे काय होईल याचा विचार न करता मी राजगृहाच्या दिशेने पळत सुटलो. तिकडे एखादा महापूर आल्यासारखे लोक जमले होते. या घटनेमुळे अवघा शोकसागरात बुडाला होता.
निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले
दया पवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलेली ही भावना केवळ त्यांची एकट्याचीच नव्हती तर लक्षावधी भारतीयांची होती. याची पुष्टी CID, मुंबईच्या विशेष शाखेच्या विविध अहवालांतूनही होते. या अहवालानुसार, 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास दिल्लीत राज्यसभा सदस्य व शेड्युल्ट कास्ट फेडरेशनचे नेते डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त जंगलातील वणव्यासारखे संपूर्ण शहरात विशेषतः दलित समाजात पसरले. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक दादरच्या हिंदू कॉलनी येथील बाबासाहेबांच्या राजगृह या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांची बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा होती. एवढेच लोक सांताक्रूझ विमानतळावरही होते. तिथे बाबासाहेबांचे पार्थिव दिल्लीहून येणार होते.
अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव दुपारी 2 वा. सांताक्रूझ विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत श्रीमती आंबेडकर, शांताराम शास्त्री, सोहनलाल शास्त्री, बुद्ध महाबली शास्त्री व अन्य काही लोक होते. यावेळी तिथे जवळपास 50 हजार लोक आपल्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जमले होते. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली.
उत्तर मुंबईची वाहतूक 5 तास झाली होती ठप्प
लेखक धनंजय कीर बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेविषयी सांगतात, उत्तर मुंबईची संपूर्ण वाहतूक 5 तास बंद पडली होती. त्या महापुरुषाच्या दर्शनासाठी एवढ्या मोठ्या मार्गावर दोन्ही बाजूंना मुंग्यांसारखे लोक जमले होते. घरांवर, झाडांवर, खांबांवर सगळीकडे लोक दिसून येत होते. बाबासाहेबांची अंत्ययात्रा जवळपास 2 मैल लांब होती. अंत्ययात्रा ज्या ट्रकवरून काढण्यात आली, तिच्यावर फुलांचा वर्षाव सुरू होता.
याचीही पुष्टी CID च्या रिपोर्टमध्ये होते. हा रिपोर्ट सांगतो की, दुपारी 1.40 वा. च्या सुमारास बाबासाहेबांचे पार्थिव जनतेच्या दर्शनार्थ एका ट्रकवर ठेवण्यात आले. अंत्ययात्रा खारेघाट, व्हिन्सेंट रोड, दादर रोड, पोइवाडी, एल्फिन्स्टन ब्रिज, सायानी रोड, गोखले रोड व रानडे रोड मार्गे सायंकाळी 6.30 वा. शिवाजी पार्क स्थित चौपाटीवर पोहोचली. यावेळी जवळपास लाखो लोक उपस्थित होते.
मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत?
यावेळी आचार्य अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मराठी पत्रकार व लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली?
महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकोनशतकी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.
त्यानंतर बाबासाहेबांचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले. त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर यशवंतराव आंबेडकरांनी रात्री 7.30 च्या सुमारास बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि ज्ञानाचा महामेरू पंचत्वात विलिन झाला. बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देताच उपस्थित धाय मोकलून रडू लागले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/dr-babasaheb-ambedkar-life-journy-last-24-hours-story-134071391.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=134071391&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXz8nMy9ZLySyrTMxNLEosycjUS87P1S83M0pOCs0NM%2FFPsq8rSk1LLSrKzEuPTyrKLy9OLbJ1zijKz00FADyy%2BNtDAAAA
या बातमीचे प्रायोजक आहे.
जाहिरात
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.























Post a Comment