Khandesh Darpan 24x7

तुमच्या स्मार्टफोनमधील कॉल सेटिंग्ज अचानक कशा बदलल्या? यामागचं कारण काय? जाणून घ्या



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -




जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर काही दिवसांपूर्वी तुमच्या फोनमध्ये झालेले बदल तुमच्या लक्षात आलेच असतील. अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या कॉल आणि डायलरची सेटिंग अचानक बदलल्याने अनेक अँड्रॉइड युझर्स चकित झाले आहेत.


सोशल मीडियावर अनेकजण आपल्या फोनमध्ये अचानक बदल झाल्याचं सांगत प्रश्न विचारत आहेत. काहींनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे.


अँड्रॉइड फोनवरून एखाद्या व्यक्तीला कॉल करताना किंवा आलेला कॉल रिसिव्ह करताना फोनचा इंटरफेस म्हणजेच डिस्प्ले आणि डिझाइन बदललेलं दिसत आहे.


कुठल्याही सेटिंग्समध्ये बदल किंवा छेडछाड न करता आपोआप डिस्प्ले कसाकाय बदलला, या शंकेने अनेकांना गोंधळात टाकले आहे. आपला फोन हॅक तर नाही ना झाला, अशी शंकाही काहींनी उपस्थित केली.


अनेक अँड्रॉइड युझर्सनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून याबाबत माहिती शेअर केली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जगभरातील अँड्रॉइड वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये झालेल्या या बदलाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं आहे.





हे बदल फक्त अँड्रॉइड फोनमध्ये झाले आहेत. आयओएस फोनमध्ये अशा प्रकारे बदल झालेला नसल्याने तो फोन वापरणाऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही.


पण अँड्रॉइड फोनमध्ये हे बदल नक्की कशामुळे झाले, या सेटिंग्स नेमक्या कशा बदलल्या, त्या पुन्हा पूर्वीसारख्या करता येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.


'हॅकिंग' की अपडेट - खरे कारण काय?

या प्रकरणावर अनेक वापरकर्त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. कुणी याला 'हॅकिंग'शी जोडले, तर काहींनी ही अपडेट राज्य संस्थांकडून आपल्यावर पाळत ठेवण्याचा प्रकार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली.

एका वापरकर्त्यानं एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करत दावा केला, "अभिनंदन, तुमच्या फोनच्या सेटिंग्सदेखील बदलल्या आहेत. एक सॉफ्टवेअरदेखील आपोआप इन्स्टॉल झाले आहे जे आता तुमच्याविरुद्ध पोपटासारखे बोलेल."

तर अन्य एक वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित केला, "तुमच्या हातात असलेल्या मोबाइल फोनच्या सेटिंग्ज अचानक बदलल्या आहेत. तुम्हाला खरंच वाटतं का, की तुम्ही सुरक्षित आहात?"




मात्र 'एका युजरनं' म्हटलं की, फोनच्या डिस्प्ले सेटिंग्ज बदलणे म्हणजे 'हॅकिंग' नव्हे, किंवा कंपनी तुमचे फोटो किंवा मेसेजस चोरत आहे, असंही काही नाहीये.

त्यांच्या मते, मोबाइल कंपन्या वेळोवेळी फोन अपडेट करत असतात, जेणेकरून तो आधीच्या तुलनेत अधिक चांगला आणि सुरक्षित होईल.






परंतु हे घडलं कसं?

तर, सर्व अँड्रॉइड फोनचं सॉफ्टवेअर गुगलकडून तयार केलं जातं आणि त्याच्याकडूनच अपडेटही केलं जातं.

कंपनीने 'मे 2025' मध्ये घोषणा केली होती की, ते 'मटेरिअल 3 डी एक्स्प्रेसिव्ह' नावाचे अपडेट आणत आहेत, जे मागील काही वर्षांतील सर्वात मोठ्या अपडेट्सपैकी एक असेल.

या अपडेटद्वारे फोनमधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेचा वापर अधिक सोपा आणि जलद आणि अधिक माहितीपूर्व होईल, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.




यापूर्वी आपल्या अँड्रॉइड फोनचा डिस्प्ले 'मटेरिअल 3D' या डिझाइनवर चालत होता. गुगलच्या माहितीनुसार 'अब्जावधी युझर्सद्वारे नियमितपणे वापरला गेल्यानं त्यांना त्याची सवय झाली होती.

गुगलने सांगितलं की, नवीन डिस्प्ले सेटिंग्जमध्ये अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत. जसे की नोटिफिकेशन्स, कलर थीम्स, फोटोज, जीमेल आणि वॉच इत्यादी. यातील अपडेट्सदेखील याचाच एक भाग आहे.


पण युझर्सच्या परवानगीशिवाय या सेटिंग्स कशा बदलल्या?



हे अपडेट सुरुवातीला जूनमध्ये काही वापरकर्त्यांना देण्यात आलं होतं आणि नंतर टप्प्याटप्प्यानं मोठ्या प्रमाणावर रोलआऊट करण्यात आलं.

गुगलच्या म्हणण्यानुसार, यामागचा उद्देश कॉलिंग अ‍ॅप अधिक सोपं करणे हा आहे.

गुगलने 'रिसेन्ट' (अलीकडील कॉल्स) आणि 'फेव्हरेट्स' हे पर्याय काढून टाकले असून त्यांना 'होम'मध्ये मर्ज केलं आहे. त्यामुळे आता तुम्ही फोन अ‍ॅप उघडल्यावर तुम्हाला फक्त 'होम' आणि 'कीपॅड' हे पर्याय दिसतील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता एकाच नंबरवरून आलेले सर्व कॉल्स एकत्रितपणे किंवा एकाच ठिकाणी दाखवले जाणार नाहीत, तर कॉल हिस्ट्रीमध्ये वेळेनुसार दाखवले जातील. त्यामुळे तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट शोधायची गरज पडणार नाही.

'यामुळे वापरकर्ते कॉल हिस्ट्री अधिक स्पष्टपणे समजू शकतील', असं गुगलंच म्हणणं आहे. तसेच, प्रत्येक नंबर वेगळा उघडून किती मिस्ड कॉल्स आहेत किंवा किती रिसिव्ह झाले हे पाहण्याची गरज पडणार नाही, असंही स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे.




यासह, 'इनकमिंग कॉल' आणि 'इन-कॉल' चे डिझाइनही वापरकर्त्यांच्या फीडबॅकनंतर बदलण्यात आले आहे. नवीन डिझाइननुसार इनकमिंग कॉलची रचनाही बदलण्यात आली आहे. जेणेकरून वापरकर्त्यांकडून खिशातून फोन काढताना चुकून कॉल रिसिव्ह किंवा कट होऊ नये.

गुगलचा मॅसेज आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून असे दिसते की, अनेक वापरकर्त्यांचे फोन अ‍ॅप आपोआप अपडेट झाले, परंतु बरेच लोक असे आहेत ज्यांच्या फोनच्या सेटिंग्ज अजूनही बदललेल्या नाहीत.




गुगल ब्लॉगवर एका वापरकर्त्याने सांगितले की, गुगल प्ले स्टोअरमध्ये (जिथून अ‍ॅप्स इन्स्टॉल किंवा अपडेट केल्या जातात) काही वापरकर्त्यांच्या फोनवर ऑटो-अपडेट्स ऑन असतात, त्यामुळे काही अ‍ॅप्स आपोआप अपडेट होतात.

त्यांनी पुढे असेही सांगितले की, वापरकर्ते हे ऑटो-अपडेट्स ऑफ करू शकतात आणि फोन कॉलच्या डिस्प्ले सेटिंग्ज पुन्हा पूर्वीसारख्या करण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अनइन्स्टॉल अपडेट्स' या पर्यायावर क्लिक करू शकतात.


जेव्हा एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) एका वापरकर्त्याने कंपनीला विचारले की, त्यांनी असे का केले, तेव्हा त्याला उत्तर मिळाले की, "हे वनप्लसकडून नाही तर गुगल फोन अ‍ॅपच्या अपडेटमुळे झाले आहे. जर तुम्हाला अजूनही फोनमधील जुनी स्टाईल (शैली) आवडत असेल, तर अपडेट्स अनइन्स्टॉल करा."

त्यामुळे तुमच्या अँड्रॉइड फोनमध्येही बदल दिसून आले असतील तर गोंधळून जाऊ नका. जर तुम्हाला अजूनही जुनी स्टाईल आवडत असेल आणि हे नवीन अपडेट नको असतील, तर तुम्ही नवीन अपडेट्स अनइन्स्टॉल करून जुनी स्टाईलदेखील निवडू शकता.


या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post