"गिरीश महाजन साहेब, आता कोणती शाई लावली?" : एकनाथ खडसेंचा भाजप नेत्यांना टोला ; म्हणाले- आता घराणेशाही कोण बोलणार?
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा वाद आता राजकीय वातावरणात स्पष्ट जाणवू लागला आहे. जळगावसह चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर या ठिकाणी प्रमुख पक्षांचे नेते व आमदार आपल्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच गाजतो आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील मोठ्या नेत्यांनी पत्नी किंवा कन्यांना तिकीट देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक दोघंही आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घडामोडींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोले लगावले आहेत.
चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण मैदानात उतरल्या आहेत. पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनीता पाटील उमेदवार आहेत. तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भुसावळमध्ये भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे उमेदवार बनल्या आहेत. मुक्ताईनगर येथे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची कन्या रंजना पाटील शिंदेसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उदाहरणांमुळे घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधारी पक्षातील अनेकांना स्वतःवर होत असलेल्या टीकेची धार आता उलट त्यांच्या दिशेने वळत असल्याचे चित्र दिसत आहे.
या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुसावळ येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्या प्रचार सभेत बोलताना खडसे म्हणाले की, माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद झाली आहेत. खडसे यांच्या मते, जे लोक नेहमी त्यांच्यावरच घराणेशाहीचा ठपका ठेवत होते, त्यांचीच मंडळी आता आपल्या पत्नींना, नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना तिकीट देतायत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना आता काही आधार उरलेला नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सावकारेंपासून ते मंत्र्यांच्या पत्नींच्या उमेदवारीपर्यंत अनेक उदाहरणे समोर ठेवत भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला.
त्यांची भूमिका ढोंगीपणाची ठरते
यावेळी खडसे यांनी विशेषत: गिरीश महाजन यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले, महाजन साहेब नेहमी म्हणतात की नाथाभाऊ म्हणजे खडसे घराणेशाही करतात. मग आता तुम्ही कोणती शाई लावली? तुमच्या पत्नीला बिनविरोध जिंकवून आणलं. मंगेश चव्हाण, किशोर आप्पा यांनीही बायकोला तिकीट दिलं. मग आता माझ्यावर बोट दाखवणारे कुठे गेले? खडसे यांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांनी पुढे सांगितले की, जे लोक घराणेशाहीचा मुद्दा वापरून त्यांच्यावर राजकीय वार करत होते, ते आता स्वतःच त्याच पद्धतीने राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ढोंगीपणाची ठरते, असा घणाघात त्यांनी केला.
घराणेशाहीचा मुद्दा आणखी पेटला
जळगाव जिल्ह्यातील या निवडणुका स्थानिक पातळीवर कितीही छोट्या असल्या, तरी त्या राजकीय प्रतिष्ठेबद्दल अधिक आहेत, असे अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते स्वतःची ताकद दाखवण्यासाठी कुटुंबीयांना उमेदवारी देत आहेत, तर विरोधक या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या विधानामुळे घराणेशाहीचा मुद्दा आणखी पेटला असून पुढील काही दिवसांत हा विषय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, जळगाव जिल्ह्यातील राजकारण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या बातमीचे प्रायोजक आहे.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











Post a Comment