सन २०१७ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचं ५ मे रोजी लग्न झालं आणि ८ मे ला त्यांना देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला.
प्रतिनिधी | चाळीसगाव
लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते. लग्नानंतर फिरायला जाणं, आपल्या आयुष्यभरच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवन सुखानं जगणं हे प्रत्येकाला आवडतं. मात्र जवान मनोज पाटील यांचं ५ मे रोजी लग्न झालं आणि ८ मे ला त्यांना देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान आज देशाच्या संरक्षणासाठी रवाना झाले.
देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलावणं आलं आहे. जवानांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. लग्नाची मनोहर स्वप्नं, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी ५ मे रोजी लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील (रा. खेडगाव नंदी) हा जवान हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना झाला.
पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं.
मुलगा देशसेवेसाठी निघाला असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले, तर पत्नीही भावूक झाली. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य आणि देशाच्या 'Operation Sindoor' साठी माझं सौभाग्य पाठवतेय अशी प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने यावेळी दिली.


















إرسال تعليق