Khandesh Darpan 24x7

भिंत चालली, रेडा बोलला:ज्ञान, भक्ती आणि माणुसकीची शिकवण जगाला देणारे संत ज्ञानेश्वर... ज्यांनी नाकारले तेच डोक्यावर घेऊन मिरवले




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  


महाराष्ट्राला संत परंपरेचा स्वर्ग लाभलेला आहे. आपल्या विचारातून, आपल्या दोह्यातून आणि आपल्या इच्छाशक्तीतून रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर माउली. ज्यांनी खेळायच्या-बागडायच्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली आणि संपूर्ण जगाला मानवतेचा मंत्र दिला. केवळ ज्ञानेश्वरीच नाही तर अमृतानुभव आणि त्यांच्या अभंग रचनांमधून त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच जगाला लाखमोलाचा संदेश दिला. त्यांच्या अल्प आयुष्यात त्यांनी जे महान कार्य केले, ते भारतीय संतपरंपरेतील एक अमूल्य ठेवा आहे. जो गेल्या कित्येक वर्षांपासून संत परंपरेत श्रेष्ठ मानला जातो. संत ज्ञानेश्वरांनी जाती धर्माचा तेढ मोडून काढला.



इ.स. १२७५ मध्ये पैठणजवळील आपेगावात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी एका सुपुत्राने जन्म घेतला. कोणीच विचार केला नव्हता की एका सामान्य घरात जन्मलेला हा पुत्र एक दिवस सर्वांच्या ओठांवर खेळेल. ज्ञानेश्वर लहान असतानाच त्यांचे वडील विठ्ठलपंत काशीचे रामानंद यांच्या प्रभावाखाली आले आणि संन्यास घेतला. परंतु संन्यास घेऊनही त्यांनी गृहस्थाश्रमात परत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना समाजाने बहिष्कृत केले.


एकेदिवशी पहाटेच या अन्यायाला बळी पडून त्यांनी आपल्या पत्नी समवेत जलसमाधी घेतली आणि ज्ञानेश्वर व त्यांची भावंडं पोरकी झाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना वेदाध्ययन आणि उपनयनास मनाई झाली. अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरांना जातीपातीच्या तेढ्यात अडकवल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्याकडे राहण्यासाठी योग्य झोपडीही नव्हती. सार्‍या जगाने त्यांना संन्यासाचे पोर म्हणून वाळीत टाकले. लोकांनी त्यांना त्रास दिला, पण तरीही त्यांनी साऱ्या जगावर अमृताचा वर्षाव केला.



कसा बोलू लागला रेडा?



आई - वडिलांनी आत्मदहन केल्यामुळे पोरकी झालेली पोरं पैठणच्या दिशेने पायी निघाली. येथे येताच गोदावरीच्या काठावर नाग घाटावर ब्राह्मणश्रेष्ठींची सभा भरली होती. आळंदीच्या ब्रह्मवृंदा प्रमाणेच येथील ब्रह्मवृंदाने संन्याशाच्या मुलांना शुद्धिपत्र देता येत नाही असे सांगितले. ज्ञानदेव त्यांना सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे सांगत होते. मात्र त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्यावेळी पखालीत पाणी भरण्यासाठी एक रेडा आणलेला त्या ब्राह्मणांनी पाहिला. त्या रेडा आणणाऱ्याला आणि त्या रेड्याला ब्राम्हणांनी ज्ञानदेवासमोर उभे केले आणि सांगितले की, तुझा आणि या रेड्याचा आत्मा एकच असेल तर या रेड्याच्या तोंडून तू जे बोलशील ते वधवून दाखव. ज्ञानदेवाने होकार दिला आणि रेड्याच्या डोक्यावर हात ठेवताच रेडा बोलू लागला. हे पाहताच सारी सभा थक्क झाली आणि ज्ञानदेवाने चमत्कार करून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करू लागली. सर्वानी आपले शीष ज्ञान देवासमोर केले आणि माफी मागितली.



चांगदेवाचे गर्वहरण

ज्ञानदेवांचा हा चमत्कार वाऱ्यासारखा पसरला. चौदाशे वर्षांचा महान योगी चांगदेव यांच्या कानावर ही गोष्ट पडताच आपल्यात एवढी महान शक्ती नाही मग हा बालक कसा काय करू शकतो? या प्रश्नाने व्याकुळ होऊन त्याने ज्ञानदेवांना भेटण्याचा ठरवले. त्यासाठी आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्वारी वाघावर बसून आली. हातात सर्पाचा चाबूक आणि अनेक शिष्यांसह वाजत - गाजत आळंदीत आले. ज्ञानदेवांना भेटीचा निरोप पाठवला. त्यावेळी ही चारही भावंडे एका भिंतीवर बसलेली होती. निरोप मिळताच ज्ञानदेवांनी भिंतीला आदेश दिला आणि म्हणाले 'चल बाई भिंती'.


आदेशाप्रमाणे खरोखरच भिंत चालू लागली. हे पाहताच चांगदेव ज्ञानदेवांना शरण गेले आणि 'मला तुमचा शिष्य बनवा' अशी मागणी केली. याआधी चांगदेवाने ज्ञानदेवांना पत्र लिहिले होते. मात्र पात्रात 'चिरंजीव' लिहावे की 'तीर्थस्वरूप' हे न कळल्यामुळे पात्र कोरेच पाठवले. त्याच पत्राचे प्रति उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी 'चांगदेव पासष्टी' हे पुस्तक लिहिले. ज्यामध्ये पासष्ट ओव्या लिहिल्या आहेत. त्याचा अर्थ चांगदेवाला समजत नव्हता. त्यामुळे आठ वर्षाच्या मुक्ताबाईने डोक्यावर हात ठेवत प्रत्येक ओवीचा अर्थ समजून सांगितला. अश्याप्रकारे चांगदेवाचे गर्वहरण झाले. ज्ञानेश्वरांनी असे अनेक चमत्कार केले आहेत. ज्यातून कोणाचे गर्वहरण झाले तर कोणाला खरी भक्ती कळली.





ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना श्रेष्ठ वर्णात जन्म घेऊनही वर्णाश्रमाचे चटके सोसावे लागले होते. त्यांनी घेतलेल्या अनुभवांतून जाती व्यवस्थेच्या मुळे हजारो वर्ष अशाच विषमतेचे चटके सोसत असलेल्या बहुजनांच्या दुखाशी ते एकरूप झाले. आपले जीवनशास्त्रांचे ज्ञान बहुजनांनाही मिळावे म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील गीतेचे सार तत्कालीन प्राकृत या लोकभाषेतून देण्याचा निर्णय घेतला.



ज्ञानेश्वरांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे 'भावार्थ दीपिका' हे ग्रंथलेखन. भगवद्गीतेचे त्यांनी मराठीत सुलभ भाष्य केले, जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकले. ज्ञानेश्वरीत ९००० हून अधिक ओव्या असून त्यातून त्यांनी भगवद्गीतेचा गूढार्थ सहज आणि रसाळ भाषेत सांगितला आहे. ही रचना केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर ती एक काव्यात्मक, तत्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक रचना आहे. ज्ञानेश्वरीतून त्यांनी कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे सुंदर समन्वय सादर केला आहे.


ज्ञानेश्वरांनी अनेक अभंग रचले, जे आजही वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने गायले जातात. त्यांच्या अभंगांतून त्यांनी विठोबावरची अढळ श्रद्धा, भक्तीचा मार्ग आणि माणुसकीचा संदेश दिला. त्यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. त्यांच्या वाणीमध्ये सहजता, गोडवा आणि आत्मिक उर्जा होती. त्यांचे अभंग आजही पंढरपूरच्या वारीत आणि वारकरी संप्रदायात गाताना भक्तांना आनंद व शांती देतात.


संत ज्ञानेश्वरांनी जे ग्रंथ साहित्य लिहिले त्याचा मुख्य उद्देश म्हणजे सद्गुरु आणि शिष्य यांची अखंडता सतत सुरु राहावी आणि जनता जनार्दनाला आत्मसुखाचा मार्ग सतत मिळत राहावा हा होता. नष्ट होणाऱ्या सुखाचा उपभोग घेत असताना शाश्वत म्हणजेच कायम टिकून राहणारे जे सुख आहे त्याचा विसर होऊ नये. मानवाचे जीवन, सुख हे शाश्वत, अमर आहे हेच त्यांनी जगाला दाखवून दिले. 


ज्ञानेश्वरांच्या काळात जातिप्रथा आणि सामाजिक विषमता खूप तीव्र होती. त्यांनी आपल्या लेखनातून आणि कृतीतून या रूढींचा निषेध केला. त्यांच्या मते, सर्व जीव हे एकाच परमेश्वराची निर्मिती आहेत आणि त्यांच्यात कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. त्यांनी चोखामेळा सारख्या अछूत भक्तांचा सन्मान केला. त्यांनी स्त्रियांचेही स्थान उंचावले. मुक्ताबाईसारख्या बहिणीच्या रूपात त्यांनी स्त्रीशक्तीचा गौरव केला.




संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेला भक्तीचा मार्ग पुढे संत तुकाराम, नामदेव, एकनाथ आदींनी चालविला. त्यांनी निर्माण केलेल्या विचारधारेवर आधारित वारकरी संप्रदाय आजही जगभरात कार्यरत आहे. विठोबा भक्ती, कीर्तन, भजन, नामस्मरण, वारी यांचा संगम असलेल्या या परंपरेला संत ज्ञानेश्वरांनी एक गती दिली. आजही दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाणारी वारी हे त्यांचेच पुण्यस्मरण आहे.


ज्ञानेश्वरांचा वारसा आजही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगभर पसरलेला आहे. त्यांच्या नावाने अनेक संस्था, विद्यापीठे, संशोधन केंद्रे चालतात. त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. वारकरी संप्रदायात ते आजही 'माऊली' या प्रेमळ नावाने ओळखले जातात. भक्तांच्या मनात ते एक दैवतच बनले आहेत.


संत ज्ञानेश्वर हे केवळ एक संत नव्हते, तर एक युगपुरुष होते. त्यांनी समाजाला ज्ञान, भक्ती, आणि माणुसकीचा मार्ग दाखवला. त्यांच्या रचनांनी मराठी भाषेला गौरव प्राप्त करून दिला. त्यांनी भगवद्गीतेला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले आणि मानवतेचा प्रकाश पसरवला. त्यांच्या अल्प जीवनातील कार्य आज अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी आणि वाणीने महाराष्ट्रातील सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक अमित ठसा उमटवला आहे. त्यामुळेच आजही संत ज्ञानेश्वर हे प्रत्येक भक्ताच्या हृदयात 'माऊली' म्हणून वसले आहेत.




या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



सौजन्य : दै.दिव्य मराठी 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم