Khandesh Darpan 24x7

विठ्ठल म्हणजे काय, कोण?: कोणासाठी सखा, कोणासाठी माय - माऊली तर कोणासाठी दैवत...जाणून घ्या या स्पेशल रिपोर्टमधून



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  


'विठ्ठल'... विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही तर विठ्ठल म्हणजे माय - माउली . विठ्ठल म्हणजे दगडाची मूर्ती नाही, तर विठ्ठल म्हणजे आत्मा. विठ्ठल म्हणजे विश्वास, विठ्ठल म्हणजे श्रद्धा, विठ्ठल म्हणजे श्वास... अशा अनेक शब्दात विठ्ठलाचा उच्चार केला जातो. विठ्ठलाची लीला इतकी अपरंपार आहे की, विठ्ठल हा शब्द उच्चारताच सारे काही दुःख बाजूला सारले जाते. राहते फक्त ते नामस्मरण. पंढरपूरच्या रस्त्यावरून चालत असलेली लाखो वारीची पावलं, हातात टाळ, मुखात नामस्मरण... धूळ उडवत चाललेली वारकरी मंडळी ही केवळ परंपरा नाही, तर ती भक्तीची चालती-बोलती नदी आहे.


विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। 
जय जय विठू माउली।


म्हणत पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेले भक्तजन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताच सारा देह पांडुरंगाचा होतो. भक्ताच्या आग्रहाखातर एका विटेवर उभा राहणारा, भक्तीतल्या विश्वासावर स्वतः भक्ताच्या घरी भांडी घासणारा, एका हाकेवर मदतीसाठी धावून येणारा देव म्हणजे पांडुरंग. दर्शनासाठी आसुसलेल्या पावलांना ताकद देणारा राजा म्हणजे पांडुरंग. जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच. पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताला आज त्यांचा देव, माय - माउली भेटणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात पांडुरंगाच्या भक्तीत न्हावून निघालेल्या काही कथा.


पांडुरंगाची उत्पत्ती कशी झाली ?

युगे युगे विटेवरी शोभे करकटावरी। 
गरुडावरी आला माझा कानडा कैवारी। 
सावळा हा माझा राजा,गजर जाहला| 
हरी विठ्ठलविठ्ठल जय हरी विठ्ठल|

पांडुरंगाच्या आख्यायिका या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात. ज्याला पांडुरंगाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते. सहाव्या शतकात पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या प्रेमात आकांत बुडाला होता. आई-वडील म्हणजे त्याच्यासाठी त्याचे देव होते. तो आपल्या माता -पित्याची सेवा करायचा. भगवान श्री कृष्ण परमात्माचे अवतार कार्य संपल्यावर श्री कृष्ण आपल्या गोपाळांसमवेत व गोपींसमवेत पंढरपूरच्या दिशेने पुंडलिकाचे आई-वडिलांप्रती प्रेम बघून भेट घेण्यास निघाले. त्यावेळी पुंडलिक राय आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. तेव्हा देव तिथे आले आणि म्हणाले की, 'पुंडलिका मी तुझी आई-वडिलांप्रती भक्ती पाहून प्रसन्न झालो आहे. तू आई- वडिलांची सेवा करतोस म्हणजेच तू माझी सेवा करतोस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.' तेव्हा पुंडलिक त्यांना म्हणाले की, 'देवा माझे आई - वडील आता निद्रेत आहेत आणि मी त्यांची सेवा करतो आहे. त्यांची निद्रा भंग होईल.'




'माझिया पित्याचा होईल निद्रा भंग'।

म्हणून तू पाठीमागे उभा राहा आणि बोलू नको असं सांगितलं. तेव्हा देवाने विचारले की, 'मी कुठे उभा राहू?' तेव्हा पुंडलिकाने एक वीट घेतली आणि पांडुरंगाच्या दिशेने फेकली. त्याच विटेवर पांडुरंग कमरेवर हात ठेऊन उभे राहिले. पुंडलिकाची सेवा पूर्ण झाल्यावर भगवान म्हणाले 'मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय हवं आहे? ' तेव्हा पुंडलिक म्हणाला की, देवा तू या नगरीतून जाऊ नकोस. येथे अनेक दृष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांचा उद्धार झाला पाहिजे त्यामुळे देवा तू माझ्या गावातून जाऊ नकोस.' हे मागणं ऐकताच पांडुरंग पंढरपुरातच राहिले आणि आज लाखो भक्त त्यांची तल्लीन होऊन भक्ती करतात. या वरूनच समजते की, पांडुरंग आपल्या भक्तांसाठी कमरेवर हाथ ठेऊन संयमी राहून मदत करतो.


जनाबाईंची घरी पांडुरंगाने भांडे घासले !

आपल्या ओव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संत साहित्यात आपला हातभार लावणाऱ्या जनाबाई प्रत्यक्षात विठ्ठलाच्या नितांत भक्ती करायच्या. जात्यावर दळन दळताना विठ्ठलाचे नामस्मरण करत 'विठ्ठला ये रे माझ्या मदतीला' अशी हाक देताच जनाबाईंच दळण दळू लागण्यासाठी विठ्ठल येत असत. अशी आख्यायिका आहे. एवढंच नव्हे तर विठ्ठलाने जनाबाईंच्या म्हणण्यावरून भांडी देखील घासली आहेत. त्याच झालं असं होत की, संत जनाबाई या नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहत होत्या. त्या दररोज घरकाम करीत असताना देखील सतत "विठ्ठल...विठ्ठल..." म्हणत विठोबाचे नामस्मरण करत असत.


एकदा, घरात खूप काम होते. भांडी खूप साचली होती. जनाबाई दिवसभर खपून काम करत होत्या. संध्याकाळ झाली तरी थकव्यामुळे त्या भांडी घासू शकल्या नाहीत. त्या विचार करत होत्या, "हे पांडुरंगा, आता हे भांडी कोण घालणार?" पण अतिशय थकलेल्या असल्याने त्या विठोबाचे नाम घेत झोपी गेल्या. त्या रात्री एक अद्भुत गोष्ट घडली. विठोबा स्वतः पंढरपूरहून आले. काळा कुळवळा विठोबा, कमरेला उत्तरीय, डोक्यावर तुळशीमाळ, भाळी चंदन आणि डोळ्यांत प्रेम. विठोबा शांतपणे जनाबाईच्या घरात आले, आणि अंगणात पडलेली भांडी घेऊन एकेक करून घासू लागले. तेवढ्यात नामदेव आले आणि त्यांनी पाहिलं – कोणीतरी भांडी घासत आहे. जवळ जाऊन पाहतो तर तो स्वतः विठोबा! नामदेव चकित झाले. त्यांनी नम्रतेने विचारले, "माऊली, हे काय करीत आहात?"


विठोबा मंद हसले आणि म्हणाले, "माझ्या जनाईची सेवा मी करत आहे. ती दिवसभर माझं नाम घेत घेत काम करते, आता थकली आहे. तिचं काम थोडं मी केलं तर बिघडलं का?" हा प्रसंग संत जनाबाई आपल्या ओव्यांतून स्प्ष्ट करतात.


"भांडी घासित होते पांडुरंग, 
जनी झाली विसरुनी अंग."


हा प्रसंग भक्तीचा सर्वोच्च टप्पा दाखवतो. जिथे देव स्वतः भक्तांच्या सेवेसाठी झुकतो. ही गोष्ट भक्तीने देवाला बांधून ठेवता येते हे स्पष्ट करते.




विठ्ठल म्हणजे काय?

विठ्ठल म्हणजे प्रेम, भक्ती, सेवा, समर्पण, आणि भक्ताच्या प्रत्येक अश्रूत सामावलेला एक साक्षात परमात्मा आहे. 'विठ्ठल' या शब्दाची व्युत्पत्ती 'विठ + थळ' अशी मानली जाते. याचा अर्थ 'वाटेवर उभा असलेला देव'. विठोबा हा असा देव आहे, जो आपल्या भक्तांमध्ये मिसळतो. संत नामदेव, तुकाराम, जनाबाई, चोखामेळा यांनी विठोबाला नुसता देव म्हणून नव्हे, तर आपला सखा, बंधू, प्रियकर, मुलगा म्हणून पाहिलं.

तुकाराम म्हणतात,

"पंढरीनाथा माझा, 
सखा पंढरीनाथा...

माझा मुळे माझा विठोबा..."

विठोबा कोणत्याही बाह्य उपचारांची गरज न बघता, केवळ अंतःकरणातील शुद्ध भावनांवर प्रसन्न होतो. महाराष्ट्रातील संतपरंपरा विठोबाभोवती फिरते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, सावता माळी, चोखामेळा – हे सर्व संत विठोबाचे उपासक होते. त्यांच्या अभंग, ओव्या आणि कीर्तनांमध्ये विठोबा हे परम तत्व, ब्रह्म, आणि मोक्षाचा मार्ग मानला जातो. वारी म्हणजे भक्तीची चालतीबोलती नदी आहे. ज्यात सर्व जाती, पंथ, वय, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत हे भेद नाहीत. कारण विठोबा सर्वांना आपला मानतो.


"जे का रंजले गांजले, 
त्यासी म्हणे जो आपुले

तोचि विठोबा रखुमाईचा..."

पांडुरंग म्हणजे तुमच्यासाठी काय? यावर बोलताना वारकरी म्हणतात, "आमचा पांडुरंग आमचा सखा, सोबती आहे. आमचं सर्वस्व आहे."


वारकरी 

विठोबा हा वैभवशाली मंदिरात बसणारा देव नाही. तो गावा-खेड्याच्या मातीशी जोडलेला आहे. त्याचे हात कमरेवर, जणू काही विचारतोय "काय, आला का माझा भक्त?" त्याला ना मखर पाहिजे, ना सुवर्ण पूजा. त्याला हवं असतं ते मनापासूनचं नामस्मरण, साधीशी ओवी, आणि प्रेम. भक्तीत तल्लीन असलेल्या भक्ताच्या पाठीशी उभा असणारा हा सावळा. पांडुरंग ना कुठल्या जातीचा ना कुठल्या धर्माचा. तो केवळ भक्तांचा. 


याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'चोखामेळा'. चोखामेळा चरित्रात लिहिल्याप्रमाणे, चोखामेळा हे विठोबाच्या नगरीत प्रथमच पोहोचले होते. पण विठोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. 'एक अस्पृश्य मंदिरात कसा जाईल?' असे लोक म्हणाले. त्यामुळं चोखामेळा मंदिराच्या बाहेर बसूनच विठोबाचं भजन करायचे. त्यांच्या आवाजात इतकी भक्ती होती की, मंदिराच्या आत बसलेल्यांना देखील त्या भावनेचा स्पर्श व्हायचा. त्यांच्या भजनांनी वातावरण प्रसन्न व्हायचं.


एके दिवशी रात्री, जेव्हा चोखामेळा विठोबाला आर्तपणे साद घालत होते. तेव्हा विठोबाने त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणाला, “हे चोखा, तू मंदिराच्या बाहेर असलास तरी माझ्या अंतःकरणात आहेस.” हा प्रसंग म्हणजे भक्तीपुढे जात, वर्ण, भिंती काहीही अडथळा ठरत नाहीत, याचं जिवंत उदाहरण आहे.


चोखामेळ्याचा शेवटही भक्तीला साजेसा होता. एक दिवस विठोबा मंदिराच्या भिंतीचा भाग कोसळला आणि चोखामेळा त्यात सापडले. त्यांच्या मृत्यूने सारे गाव हादरलं. विठोबाचा हा भक्त मंदिराच्या अगदी दारातच गेला. पुढे त्याच ठिकाणी चोखामेळ्याची समाधी बांधण्यात आली, जी आजही मंदिराच्या अगदी जवळ आहे. दरवर्षी लाखो वारकरी त्या समाधीला नमस्कार करत जातात.


संत चोखामेळ्यांचा हा प्रसंग केवळ भक्तीचा नाही, तर सामाजिक समतेचा, श्रद्धेचा आणि मानवीत्वाचा संदेश देणारा आहे. एक अस्पृश्य म्हणून वागवलं गेलं, पण विठोबाने आपल्या लेकराला कुरवाळत समाजात मानाचं स्थान मिळवून दिल. त्यामुळे विठोबा म्हणतात,


'भक्ती ही जातीने नव्हे, तर मनाने ठरते.'


वारकरी

संत सावता माळी यांचा विठोबाशी असलेला संवाद सुद्धा असाच सजीव आणि थेट होता. सावता माळी शेतीकाम करणारे गृहस्थ होते. त्यांना वारीला जायचं होतं, पण शेतीची कामं पडली. त्यांचं मन गहिवरलं. त्यांनी विठोबाला मनातच हाक दिली. "वारी नाही करता येत रे देवा, पण तू तरी येशील का माझ्या कडेवरती?" तेव्हा सावता माळीला काम करत असताना विठोबाचं दर्शन झालं. 


भक्ती ही अशी असते कुठे मंदिरात जाताना दिसते, कुठे शेतात काम करताना. हे सर्व चमत्कार फक्त दंतकथा नसून, त्यामागे साहित्यिक, ऐतिहासिक, आणि भौतिक पुरावे आहेत. संतांच्या लेखनातून, समाधी स्थळांतून, मूर्तीच्या स्थितीतून आणि जनमानसाच्या श्रद्धेतून हे प्रसंग आपल्याला ठामपणे सिद्ध होतात. “पांडुरंगाच्या भक्तीसमोर कोणतीही भिंत टिकत नाही.” तो जात, धर्म, वर्ण, लिंग पाहत नाही. तो पाहतो फक्त मनातील श्रद्धा. तसेच या भक्तचरित्रांमधून दिसून येतं की विठोबा केवळ देव नाही, तर तो एक क्रांतिकारी सामाजिक शक्ती आहे. जो जात-धर्म, पंथ यांवर नाही तर भावनेवर प्रेम करतो. विठोबाची मूर्ती भौतिक नसून, ती एक समाजशास्त्रीय मूर्तीही आहे. जो अस्पृश्यतेवर घाला घालणारा आणि सर्वांना एकत्र बांधणारा आहे.






विठ्ठल नेमका कोणाचा?

महाराष्ट्राच्या मातीत संत परंपरा ही अनेक शतकापासून आहे. पंढरपूर हे एकमेव असे दैवत आहे ज्यावर अनेकांची श्रद्धा आहे. पंढरपूरच्या वारीची वर्षभर आस लागलेली असते. पायी, अनवाणी वारी करत पांडुरंगाच्या चरणी लिन होणे हाच काय तो अट्टहास असतो प्रत्येक भक्ताचा. त्यामुळे ही वारी साऱ्या पंचक्रोशीत दुमदुमते. 


राज्यातून ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम यांची पालखी निघते ती वेगवेगळ्या ठिकाणहून. तसेच पंढरपूरच्या वारीला केवळ लोक महाराष्ट्रातून येत नाहीत तर कर्नाटकातूनही लोक वारीसाठी येतात. त्यामुळे हा अनेक वर्षांचा वाद आहे की, पांडुरंग नेमका कोणाचा? यावर अनेक अभ्यासकांनी अभ्यास केला. यावर बोलताना इरावती कर्वे आपल्या 'महाराष्ट्र: एक अभ्यास' या त्यांच्या संशोधनपर ग्रंथात म्हणतात , "असा विठोबा, आपले आराध्यदैवत असूनही कुणाचेही कुलदैवत नाही. वर्षानुवर्षे त्याची पूजा करण्याचा मान ज्या बडवे, डिंगरे, दिवटे, पुजारी, बेणारे यांच्याकडे होता, त्यांचंही ते कुलदैवत नाही. तेव्हा तो ज्याअर्थी कुलदैवत नाही, त्या अर्थी इथल्या मूळच्या लोकांचा तो देव नसावा', अशी शंका त्यांनी आपल्या 1971 सालच्या या पुस्तकात व्यक्त केली आहे.


पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत. त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. त्याशिवाय, आणखीही लहान-सहान बाबींमधून त्याचे 'कानडेपण' सिद्ध होते. त्यामुळे, त्याची दक्षिणेशी अधिक जवळीकता उठून दिसते, अशी अभ्यासकांची मांडणी आहे.


आजही, पांडुरंग विठ्ठलाची उपासना उत्साही आहे. त्यांच प्रेम, नम्रता आणि भक्तीचा संदेश पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनित होतो. खरं तर, पंढरपूर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जे दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. विठ्ठलाशी संबंधित शिकवणी व्यक्तींना करुणा, निस्वार्थीपणा आणि उच्च आदर्शांवर लक्ष केंद्रित करून जगण्यास प्रोत्साहित करतात. पायी वारी करताना पाऊस असो की रखरखीत ऊन, वारीचा उत्साह कधी कमी होत नाही. एका थांब्यावर एखादा शेतकरी पाणीवाटप करतो, तर दुसरीकडे गावकरी फराळ देतात. कोणी वाऱ्यावर भजन म्हणतात तर कोणी आकाशात विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल म्हणून झेंडा घेतात.





भौतिकवाद आणि व्यक्तिवादाचे वर्चस्व असलेल्या जगात, पांडुरंग विठ्ठलाची कथा आणि उपासना लोकांना भक्ती आणि समुदायाच्या शक्तीची आठवण करून देते. ते व्यक्तींना दररोजच्या आव्हानांवरून वर येण्यास आणि परमात्म्याशी सखोल संबंध शोधण्यास प्रेरित करतात.


विठोबाशिवाय वारी नाही अन वारीशिवाय विठोबा नाही !




हजारो, लाखो पावलांची, पण एका हाकेची. त्या हाकेला उत्तर देणारा म्हणजे पांडुरंग. आणि हाक देणारा म्हणजे वारकरी. त्यामुळे वारी आणि पांडुरंग यांचा संबंध म्हणजे अगदी देह आणि श्वासासारखा. एक नसला तर दुसऱ्याचा अर्थच उरत नाही.


वारी म्हणजे केवळ आषाढात पंढरीची वाट चालणं नाही. ती एका अंत:प्रवासाची सुरुवात असते आणि या प्रवासाच्या शेवटी दिसतो तो एका दगडावर उभा असलेला, हात कंबरेवर ठेवलेला, काळासावळा विठोबा. पण खरा विठोबा वाटेतच भेटत असतो. जेव्हा आपण थकलो तेव्हा कोणी पाणी दिलं, जेव्हा आपण एकटे पडलो तेव्हा कोणीतरी ओवाळलं, आणि जेव्हा आपण हरलो तेव्हा कोणी हात पकडून म्हणालं, "ए चल, देऊळ आलं!"


वारीचा आरंभ हा भक्ताच्या अंतर्यात्रेचा पहिला टप्पा असतो. एखाद्या वर्षी एखाद्याचं मन थोडं हलकं वाटतं, तो चालायला निघतो. त्याला ठाऊक नसतं की ह्या चालण्यातून त्याला विठोबा भेटणार आहे. कारण विठोबा हा देव कुठल्या एकाच गाभाऱ्यात नसतो. तो चालणाऱ्याच्या थकलेल्या पावलांत असतो. तो भजनात, तुकारामाच्या अभंगात, आणि 'गोपाळ काळा'च्या गजरात असतो.


वारकरी

वारकरी माणूस जेव्हा घर सोडतो, तेव्हा तो संसार सोडत नाही, तो त्याला अधिक अर्थ देतो. तो म्हणतो, "हे जीवन आहे तात्पुरतं, पण या तात्पुरत्या जीवनात मी पांडुरंगाला शोधणार." म्हणून वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर ती शोधयात्रा आहे.


पांडुरंग कोण? तो एक मूर्ती आहे. हो. पण त्यापेक्षा तो एक प्रतीक आहे. प्रेमाचं, समतेचं, अढळ श्रद्धेचं. म्हणूनच तो उभा असतो. बसलेला नाही. कारण त्याला वाट पाहावी लागते. भक्ताच्या येण्याची... आणि म्हणून तो स्थिर असतो, कारण भाविक अजून फिरतो आहे. वारी हा भक्त आणि विठोबामधला अनुबंध आहे. जी शपथ प्रत्येक पावलात पुन्हा पुन्हा घेतली जाते. "मी तुझा आहे रे देवा. मी परत आलोय." त्या पावलात पांडुरंग असतो. म्हणून, वारीविना विठोबा अधुरा आहे. आणि विठोबाविना वारीचा अर्थच नाही.


तुकाराम म्हणतात,

"देहासी वारी | नाम घेई जीवा ||"

म्हणजे, वारी फक्त शरीराने चालणं नाही. ती तर आत्म्याची तृष्णा आहे. आणि त्या तृष्णेचा एकमेव तह पंढरीच्या वाळवंटात होतो, जेव्हा पांडुरंगाची एक झलक मिळते.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 सौजन्य : दै.दिव्य मराठी 


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

أحدث أقدم